उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. एका घरात काम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या मालकिणीच्या एका थप्पडचा बदला घेण्यासाठी त्यांच्या घरातून ४० हजार रुपयांची रोकड आणि दागिने चोरले. पोलिसांनी या घटनेचा १६ तासांत छडा लावून मोलकरणीला अटक केली आहे.
मुरादाबादच्या एका उच्चभ्रू कॉलनीमध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरात ही घटना घडली. गेल्या तीन महिन्यांपासून ही मोलकरीण त्यांच्याकडे काम करत होती. काम करत असताना एका क्षुल्लक कारणावरून तिचे मालकिणीसोबत भांडण झाले. या भांडणात मालकिणीने तिला ओरडून एक कानशिलात मारली. या अपमानामुळे दुखावलेल्या मोलकरणीने मनात बदला घेण्याचा कट रचला.
नेमकं काय घडलं?पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. घरमालकांना घरातून किंमती वस्तू आणि रोकड गायब झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना घरात काम करणाऱ्या नोकराणीवर संशय आला. चौकशीसाठी तिला ताब्यात घेण्यात आले आणि पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये तिने आपला गुन्हा कबूल केला.
या मोलकरणीने मालकिणीने मारलेल्या थप्पडचा बदला घेण्यासाठी ही चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम आणि काही सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. ही चोरी पूर्णपणे वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या मोलकरणीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.