पिंपरी : देशी दारूचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दारूच्या बाटल्या व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. २८) रात्री दहा ते सोमवार (दि. २९) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान मोशीतील तापकीरनगर येथील राजपूत देशी दारूच्या दुकानात घडली.याप्रकरणी सोमनाथ महारुद्रया स्वामी (वय ३२, रा. शिवशंकरनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी सोमनाथ यांचे मोशीतील तापकीरनगर येथे राजपूत नावाचे देशी दारूचे दुकान आहे. स्वामी हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ६ हजारांची रोख आणि ३०० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
मोशीत देशी दारुच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:49 IST