"सांगानेरमधील आनंद विहार परिसरात बॉम्बस्फोट होणार आहे...", शनिवारी मध्यरात्री ३:१७ वाजता पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या या एका फोनने राजस्थान पोलिसांची झोप उडवली. जयपूर जंक्शन आणि वैशाली नगरलाही लक्ष्य करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. पोलिसांनी तातडीने सांगानेर परिसर वेढला, हॉटेल रिकामी केली आणि रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, जेव्हा या धमकीचा सूत्रधार पकडला गेला, तेव्हा त्याने दिलेले कारण ऐकून पोलिसांनाही कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.
पोलिसांची परीक्षा घेण्यासाठी दिला 'फेक कॉल'
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे हॉटेल रघुकुलमध्ये काम करणाऱ्या रवि मीणा या वेटरला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हा खोटी धमकी दिल्याचे मान्य केले. "आणीबाणीच्या प्रसंगात पोलीस किती वेळात आणि कशा प्रकारे ॲक्शन घेतात, तसेच जनतेची काय प्रतिक्रिया असते, हे मला जवळून पाहायचं होतं," असे रविने पोलिसांना सांगितले. केवळ आपली उत्सुकता शमवण्यासाठी त्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि सांगानेरच्या रहिवाशांना रात्रभर धावपळ करायला लावली.
अख्खं शहर होतं हायअलर्टवर
धमकी मिळताच डीसीपी संजीव नैन यांच्या सूचनेनुसार सांगानेर, रामनगरिया पोलीस स्टेशनची पथके, पीसीआर ११२ आणि बॉम्ब शोधक पथक कामाला लागले होते. हॉटेल रघुकुल, गायत्री नगर आणि टोंक रोड परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटेच्या वेळी लोकांना घराबाहेर काढून परिसर सुरक्षित करण्याची मोठी मोहीम राबवण्यात आली. या सगळ्यात वेटर रवि मीणा याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला उचलले आणि सत्य समोर आले.
बीए पास तरुणाचे अजब कृत्य
धमकी देणारा रवि मीणा हा करौली जिल्ह्याचा रहिवासी असून तो बीए पदवीधर आहे. हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यापूर्वी तो गुजरातमध्ये फरशा बसवण्याचे काम करायचा. सुशिक्षित असूनही त्याने केलेल्या या कृत्यामुळे आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात जयपूर प्रशासनाला आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पोलीस आता रविच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि यामागे इतर कुणाचे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करत आहेत.
Web Summary : A bomb threat in Jaipur, later revealed as a hoax by a waiter wanting to test police response, caused widespread panic and a citywide search. The waiter, a BA graduate, is now in custody.
Web Summary : जयपुर में बम की धमकी, बाद में एक वेटर द्वारा पुलिस प्रतिक्रिया का परीक्षण करने का मज़ाक साबित हुई, जिससे व्यापक दहशत और शहरव्यापी तलाशी हुई। बीए स्नातक वेटर अब हिरासत में है।