कंटेनरच्या टाकीचा लॉक तोडून १२० लिटर डिझेलची चोरी
By रोहित टेके | Updated: March 30, 2023 09:18 IST2023-03-30T09:17:43+5:302023-03-30T09:18:01+5:30
ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत बुधवारी (दि.२९) घडली.

कंटेनरच्या टाकीचा लॉक तोडून १२० लिटर डिझेलची चोरी
- रोहित टेके
कोपरगाव : समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरच्या डिझेलच्या टाकीचा लॉक तोडून ११ हजार १६० रुपये किमतीचे १२० लिटर डिझेल सिल्वर रंगाच्या विनानंबरच्या स्कोडा गाडीतून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीत बुधवारी (दि.२९) घडली. या प्रकरणी कंटेनर चालक रामकुमार शिवप्रसाद पटेल ( वय २९, रा. बनपुरक्रा ता. शिराथु जि. कौसांबी राज्य उत्तरप्रदेश ) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के.ए. जाधव करीत आहेत.
हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर गुन्हा !
दुसरीकडे, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेगावात गोदावरी कालव्याच्या कडेला विनापरवाना हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली असून साडेचार हजार रुपये किमतीची ४५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी अर्जुन गोपाल पिंपळे, ( वय २१, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर ) याच्याविरुद्ध बुधवारी (दि.२९) रात्री उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.