मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:19 IST2019-07-11T06:18:32+5:302019-07-11T06:19:10+5:30

पाच मोटारसायकली जप्त: गुजरातच्या सीमेवरून नौपाडा पोलिसांनी केली अटक; हेल्मेट घालून बिनधास्तपणे करायचा चोरी

Theft of motorbike stolen realty thieves | मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

ठाणे : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी उभ्या मोटारसायकलची रेकी करून नंतर हेल्मेट परिधान करून तिची चोरी करणाºया शैलेश ऊर्फ सुजित शाह (२२, रा. चरई, ठाणे) या अट्टल चोरट्यास गुजरातच्या सीमेवरून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या.


ठाणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहन, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. याच अनुषंगाने ठाणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शैलेश याला गुजरातमधील उमरगा भागातील सोलसुंबा गावातून २८ जून २०१९ रोजी ताब्यात घेतले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची पक्की खबर नौपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक कवळे, पोलीस हवालदार महेश भोसले, पोलीस नाईक प्रसाद निकुंभ, हरीश तावडे, गोविंद पाटील, भागवत थाविल आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने त्याला अटक केली. दुचाकीची चोरी केल्यानंतर हेल्मेट घालून तो पळून जायचा. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय येत नव्हता. नौपाड्यातील दोन, बदलापूर, उल्हासनगर आणि शिवाजीनगर या भागातून प्रत्येकी एक अशा पाच मोटारसायकल चोरीची कबुली त्याने दिली असून या पाचही दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या.

नवी मुंबई पोलिसांनीही केली होती यापूर्वी अटक
यापूर्वी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानेही त्याला अटक केली होती. त्यावेळीही पाच ते सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघड झाले होते. त्याच्याकडे असलेल्या पाच चोरीच्या मोटारसायकली तो अल्प किमतीमध्ये विक्री करण्याच्या तयारीत असतानाच नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून, त्याच्याकडून आणखीही मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होतील.

Web Title: Theft of motorbike stolen realty thieves