ट्रॅक्टरसमोर आला आडवा; म्हणे, 'आत्महत्या करतो!', टाकरखेडा संभू शिवारातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 15:18 IST2022-11-20T15:18:20+5:302022-11-20T15:18:45+5:30
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास टाकरखेडा संभू शिवारात ही घटना घडली.

ट्रॅक्टरसमोर आला आडवा; म्हणे, 'आत्महत्या करतो!', टाकरखेडा संभू शिवारातील प्रकार
अमरावती: ट्रॅक्टरसमोर आडवे येऊन पेरणी करू देणार नाही, असे बजावत एकाने आत्महत्या करतो, असे पेरणी करण्यासाठी आलेल्यांना धमकावले. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास टाकरखेडा संभू शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी रविवारी दुपारी योगेश देशमुख (४२, टाकरखेडा संभू) यांच्या तक्रारीवरून आरोपी वामन गोविंद हंबर्डे (६५, टाकरखेडा संभू) याच्याविरूद्ध शेतात अतिक्रमण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला.
तक्रारीनुसार, योगेश देशमुख हे टाकरखेडा संभू येथील श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत. संस्थानच्या मालकीची टाकरखेडा शिवारात १०० एकर शेती आहे. पैकी ३० एकर शेतीच्या ताब्याचा मुद्दा न्यायालयात गेला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने त्या ३० एकर जमीनीचा ताबा संस्थानकडे दिला. त्यासाठी भातकुलीच्या तहसीलदाराला प्राधिकृत केले. तहसीलदारांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी संस्थानला पोलीस संरक्षणात त्या शेतीचा ताबा देखील दिला.
अशी घडली घटना
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास देशमुख हे संस्थानच्या अन्य सदस्यांसह न्यायालयीन आदेशाने ताबा मिळालेल्या त्या शेतात हरभऱ्याची पेरणी करण्यास गेले. त्यावेळी वामन हंबर्डे हा त्या शेतात आला. ट्रॅक्टरसमोर आडवा येत पेरणी करू देणार नाही, असे म्हणून त्याने शिविगाळ केली. तथा आत्महत्या करण्याची धमकी दिली. तथा शेतात जबरदस्तीने शिरून पेरणी बंद पाडली. त्यामुळे देशमुख यांनी दुपारी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विजय गिते हे करीत आहेत.