प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने काढला काटा, पोलिसांच्या तपासात उघड
By दत्ता यादव | Updated: August 12, 2023 22:02 IST2023-08-12T22:02:03+5:302023-08-12T22:02:16+5:30
कण्हेर डाव्या कालव्यात ९ रोजी एक बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.

प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने काढला काटा, पोलिसांच्या तपासात उघड
सातारा : कण्हेर डाव्या कालव्यात सापडलेल्या व्यक्तीचा खून झाला असून, हा खून प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी एका महिलेस तिचा पती आणि प्रियकराला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.विजय सुरेश भोसले (वय २४, रा. नेले किडगाव, ता. सातारा), दीपाली उर्फ मनीषा दादा बिचुकले (वय २९), दादा जयराम बिचुकले (वय ३९, रा. बावधन, ता. वाई) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटखळ माथा, ता. सातारा येथील कण्हेर डाव्या कालव्यात ९ रोजी एक बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित मृतदेहाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह शरद मधुकर पवार (वय ३७, रा. खेड, ता. सातारा) याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आणखी कसून तपास केला असता पवार याचे बावधन मधील दीपाली बिचकुले हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच कारणावरून शरद पवार आणि विजय भोसले यांचा वाद झाला होता.
पोलिसांनी विजय भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. दोघांचेही एकाच महिलेवर प्रेमसंबंध असल्याने त्यांचा वाद विकोपाला गेला. त्यातच पवार हा त्या महिलेस उसने दिलेले पैसे वारंवार मागत होता. शरद पवार हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा खून करण्याचा कट वरील संशयित तिघांनी रचला. पाटखळ माथा येथे शरद पवार याला दि. ५ रोजी बोलावून त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पाय कापडाने बांधून त्याचा मृतदेह तिघांनी कण्हेर कालव्यामध्ये फेकून दिला.
दीपाली बिचुकले तिचा पती व प्रियकराने या खुनाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार शरद बेबले, लैलेश फडतरे, अरुण पाटील, रोहित निकम आदींनी या कारवाईत भाग घेतला.
एकाच महिलेवर दोघांचे प्रेम..
एकाच महिलेवर दोघांचेही प्रेमसंबंध होते. यातून दोघांचा सातत्याने वाद होत होता. हीच माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस येण्यास पोलिसांना वेळ लागला नाही.