१३-१४ वर्षांच्या मुली ‘टार्गेट’, अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले...; एकाच दिवशी तीन तक्रारी
By प्रदीप भाकरे | Updated: February 24, 2024 13:51 IST2024-02-24T13:49:48+5:302024-02-24T13:51:02+5:30
लैंगिक छळाचा प्रयत्न

१३-१४ वर्षांच्या मुली ‘टार्गेट’, अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले...; एकाच दिवशी तीन तक्रारी
अमरावती : अल्पवयीन मुलींच्या छेडखानीचे प्रकार अलीकडे अधिकच वाढले आहेत. गावातील टारगटांनी, सडकसख्याहरींनी अल्पवयीन मुलींना सॉफ्ट टार्गेट बनविल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. २३ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी १३-१४ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींची छेड काढण्यात आली. एकीला रात्रीच्या अंधारात नेत तिचा विनयभंग करण्यात आला. त्यातील दोन घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी, तर एक घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.
अर्ध्या रात्री मुलीचे तोंड दाबले
तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १३ वर्षीय मुलगी लघुशंकेसाठी घराबाहेर पडली असता, तिचे तोंड दाबण्यात आले. तिची छेड काढण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी सचिन दांडगे (२०, रा. बग्गी) व अजय स्वर्गे (२७, रा. जहागीरपूर) यांच्याविरुद्ध शुक्रवारी दुपारी विनयभंग व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सचिन पीडिताला सोबत बाहेर घेऊन गेला, तर कोणी येते का हे पाहण्यासाठी अजय तेथे थांबल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तू मला आवडतेस!
तू मला आवडते, आपले जमते काय, असे म्हणून एका १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास लोणी पोलिसांच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. आरोपी राहुल शिंदे (रा. काजना) हा तीन महिन्यांपासून तिचा लपून-छपून पाठलाग करून तिला इशारे करीत होता. दरम्यान, ती घरी एकटीच, भांडे घासत असताना आरोपीने तिची छेड काढली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी राहुल शिंदेविरोधात विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
तुझा धिंगाणा वाजवतो
तुझा धिंगाणा वाजवतो, अशी धमकी देत एका १४ वर्षीय मुलीची छेड काढण्यात आली. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात ती घटना घडली. फिर्यादी ही घरी एकटीच असताना आरोपी गजानन खंडारे (२७, रा. काजना) हा तिच्या घरातील अंगणात आला. तुला पाहतोच, तुझा धिंगाणा वाजवतो, असे म्हणून तिचा विनयभंग करण्यात आला. त्याने शिवीगाळ करून तिला धमकी दिली. तो एक वर्षांपासून तिची छेड काढत आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गजानन खंडारेविरुद्ध गुन्हा दाखल केला.