दिल्लीच्या पहाडगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माजी प्रियकराने आपला साखरपुडा मोडल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने, ऐनवेळी पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी तरुणीचे प्राण वाचवले.
ऑफिसमधून फरफटत रस्त्यावर आणलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण थेट तरुणीच्या ऑफिसमध्ये घुसला आणि त्याने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर त्याने तरुणीचा हात पकडला आणि तिला फरफटत ऑफिसमधून बाहेर रस्त्यावर आणलं. रस्त्यावरही त्याने तिच्यासोबत हाणामारी करायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार सुरू असतानाच, तिथून गस्त घालणाऱ्या पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडलं आणि तरुणीचा जीव वाचवला.
साखरपुडा तुटण्याचं कारण ठरली बेरोजगारी!
पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, नंतर तरुणीला कळलं की, आरोपी तरुण काहीही काम करत नाही आणि तो बेरोजगार आहे. त्यामुळे तरुणीने सहा महिन्यांपूर्वीच त्याच्याशी झालेला साखरपुडा मोडला. ही गोष्ट आरोपी तरुणाला अजिबात आवडली नाही. साखरपुडा तुटल्यापासून तो सतत तरुणीचा पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता. इतकंच नाही, तर सोशल मीडियावरही तो तिला धमक्या देत होता.
चाकू हल्ला करण्यापूर्वीच पोलीस पोहोचले
आरोपी तरुणाने आता तरुणीच्या ऑफिसमध्ये घुसून तिला मारहाण केली. तिला फरफटत बाहेर आणलं आणि तिच्यावर चाकू हल्ला करण्याच्या बेतात होता. पण नशीबाने पोलीस अगदी वेळेवर तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवत तरुणीचा जीव वाचवला. ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी आरोपी पीडितेवर चाकू रोखून उभा होता. तिथे लोकांची गर्दी जमली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हाणामारी आणि गर्दी पाहून तातडीने तिथे धाव घेतली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
पोलिसांनी तात्काळ स्थानिक लोकांच्या मदतीने आरोपीकडून चाकू हिसकावून घेतला आणि त्याला अटक केली. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, साखरपुडा तुटल्यापासून आरोपी तिला सतत त्रास देत होता. तो सोशल मीडियावरही तिला सतत मेसेज करून छळ करत होता.
प्रकरणाचा तपास केला असता, तरुणीचं लग्न दुसऱ्या एका मुलाशी ठरत असल्याची माहिती समोर आली. या गोष्टीमुळे संतप्त होऊन आरोपी चाकू घेऊन पीडितेच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणीचा जीव वाचला आहे. आता पोलीस आरोपीबद्दल अधिक माहिती गोळा करत आहेत.