आजकाल वासनांधता एवढी वाढली आहे की समोरच्या व्यक्तीला नकार जरी दिला तरी आपल्यासोबत काय होईल याचा नेम नाहीय. गाझियाबादमध्ये एका एनआरआयच्या घरी वायफाय बसवायला एका कंपनीचा कर्मचारी आला होता. त्याला त्या एनआरआयची बायको आवडली, त्याने तिला मैत्रीसाठी विचारले तर तिने त्यास नकार दिला. हे पाहून त्या व्यक्तीने या महिलेचे फोटो आणि मोबाईल नंबर एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणून व्हायरल केले.
हा नराधम व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने या महिलेला तिचा मुलगा आणि पती यांनाही मारण्याची धमकी दिली होती. यामुळे ही एनआरआय महिला घाबरली होती. तिच्या पुतण्याने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत. ही घटना इंदिरापुरम पोलीस ठाणे हद्दीतील आहे.
तक्रारीनुसार या महिलेचे पती अमेरिकेत व्यावसायिक आहेत. त्यांची पत्नी, मुलगा आणि पुतण्या हे इंदिरापुरममध्ये राहतात. पती ये-जा करत असतो. जवळपास दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीचा कर्मचारी समीर चौहान हा त्यांच्या घरी वायफाय बसविण्यासाठी आला होता. तेव्हा त्याने तिचा फोन नंबर घेतला होता. वाय-फायला काही समस्या आली तर फोन करता येईल असे त्याने तेव्हा कारण दिले होते.
पती परदेशात असल्याचे पाहून या समीरच्या मनात वासना जागी झाली. त्याने तिला काही दिवसांनी मेसेज करण्यास सुरुवात केली. तिच्याशी ओळख वाढवून मैत्री करण्यासाठी तो तिला सांगत होता. तिने त्याला नकार दिला आणि पोलिसांच तक्रारही केली होती. परंतू, याचा परिणाम त्याच्यावर झाला नव्हता. काही दिवसांनी परत तो मेसेज करू लागला. त्याने तिच्या पुतण्याच्या नावाने एक बनावट अकाऊंट तयार केले आणि त्याच्यावर एनआरआयच्या पत्नीचे फोटो पोस्ट केले. तसेच त्यासोबत नंबरही पोस्ट करत एस्कॉर्ट सर्व्हिस असे म्हटले. यामुळे लोक तिला फोन करू लागले. ती या गोष्टीमुळे पुरती हादरली होती.
तिने ही गोष्ट आपल्या पुतण्याला सांगितली व समीर धमकी देत होता म्हणून त्याला फोन केला. तर समीरने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिचा पती आणि १० वर्षांचा मुलगा यांना जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पुतण्याने पोलिसांत धाव घेतली आहे.