कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार सायबर चोरटे अजूनही फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 22:58 IST2023-04-22T22:57:45+5:302023-04-22T22:58:05+5:30
परदेशातील सायबर चोरट्यांबाबत पुणे पोलिसांनी सीबीआय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे.

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार सायबर चोरटे अजूनही फरार
विवेक भुसे
पुणे - देशातील सर्वात मोठा सायबर हल्ला म्हणून गणल्या गेलेल्या या गुन्ह्याची सर्व सुत्रे ही परदेशात बसून सायबर चोरट्यांनी हलविली होती. एकाचवेळी परदेशात व्हिसा व देशात रुपे कार्डद्वारे ही फसवणूक झाली होती.सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात कमिशनसाठी एटीएममधून पैसे काढून देणारे हाताला लागले. त्यांच्याकडे क्लोन एटीएम कार्ड, त्याचा पासवर्ड देणारे तसेच ही संपूर्ण यंत्रणा हॅक करुन क्लोन व्हिसा व रुपे डेबिट कार्ड तयार करणारे मुख्य सुत्रधार अजूनही फरार आहे. त्यातील भारतात रुपे कार्ड पुरविणारा दुबईमध्ये असल्याचे सांगितले जाते.
परदेशातील सायबर चोरट्यांबाबत पुणे पोलिसांनी सीबीआय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे. इंटरपोलला या सर्व सायबर चोरट्यांनी माहिती देण्यात आली असून परंतु, पोलीस अधिकारी बदलल्यानंतर त्याचा कोणी पाठपुरावा केला नाही. त्यामुळे मुख्य सुत्रधार असलेले देशा परदेशातील चोरटे अजूनही फरार आहेत.
देशातील सर्वात मोठा सायबर हल्ला
- जगभरातील २८ देशातून २ तासात १२ हजार व्यवहाराद्वारे ७८ कोटी रुपये काढण्यात आले होते.
- त्यात ७१ बँकां आणि ४१ शहरांमधील एटीएममधून पैसे काढले गेले होते
- भारतात रुपे कार्डद्वारे २ हजार ८४९ व्यवहाराद्वारे अडीच कोटी काढले गेले.
- एकूण १४ हजार ८४९ व्यवहाराद्वारे ८० कोटी काढले.
तांत्रिकदृष्टा अतिशय किचकट असलेला हा गुन्हा व देशातील अशा प्रकारचा पहिलाच मोठा सायबर हल्ला होता. त्याचा तपास करताना बाहेरील कोणत्याही एजन्सीची मदत न घेता केवळ सायबर पोलिसांचे ज्ञान वापरुन आरोपीपर्यंत पोहचलो. त्यात शिक्षा लागल्याने मोठे समाधान आहे. - जयराम पायगुडे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे