३० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचं आमिष; ‘पॉकेट फ्रेंडली’ने घातला लाखो रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:27 IST2025-02-15T06:27:20+5:302025-02-15T06:27:20+5:30
माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले.

३० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचं आमिष; ‘पॉकेट फ्रेंडली’ने घातला लाखो रुपयांचा गंडा
मुंबई - प्रभादेवीतील पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये ३० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांकडून लाखोंची गुंतवणूक स्वीकारून पळ काढल्याचा प्रकार दादरमध्ये समोर आला आहे. सुनील गुप्ता असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.
माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले. बेस्टमध्ये काम करत असताना एका सहकाऱ्याने त्यांना पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० दिवसांत दुप्पट परतावा मिळत असल्याचे सांगितले.
...आणि विश्वास बसला
त्यानुसार, त्यांनीही सहकाऱ्यासोबत गुप्ता याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. गुंतवणुकीसाठी आलेल्या लोकांची गर्दी बघून तक्रारदार यांना देखील दामदुप्पट योजनेवर विश्वास बसला. त्यांनी भेट घेताच, गुप्ताने ३० दिवसांत दुप्पट परतावा ही योजना बंद झाली असून ४५ दिवसांत दुप्पट परतावा अशी आकर्षक योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
अशी झाली फसवणूक
गुप्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने १ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली. आणखीन काही जणांनी सात लाख रुपये गुंतवले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा देण्याची तारीख उलटून गेली. मात्र परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मागितली. तोपर्यंत गुप्ता पसार झाला होता.