अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा अत्यंत निर्घृणपणे काटा काढल्याची खळबळजनक घटना श्रीगंगानगर जिल्ह्यातील घडासाणा भागात उघडकीस आली आहे. पत्नी इंद्रा देवी हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती भजनलाल यांची हत्या करून त्यांचा मृतदेह इंदिरा गांधी कालव्यात फेकून दिला होता. तब्बल २७० किलोमीटर दूर फलोदी भागात हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या 'ब्लाईंड मर्डर'चा छडा लावला असून, निर्दयी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रेमसंबंधात पती ठरत होता अडथळा
मृत भजनलाल (३२) यांना आपली पत्नी इंद्रा हिचे प्रभूदयाल नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. यावरून घरात सतत खटके उडत होते. प्रभूदयाल हा लाकूड कापण्याचे काम करायचा आणि गेल्या दोन वर्षांपासून तो इंद्राच्या संपर्कात होता. त्याने इंद्राला गुपचूप एक सिम कार्डही दिले होते, ज्यावरून ते दोघे तासनतास बोलायचे. पतीला संशय आल्याने इंद्राने त्याला कायमचे वाटेतून बाजूला करण्याचा कट प्रियकरासोबत रचला.
१३ जानेवारीची ती काळरात्र...
१३ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास भजनलाल आपल्या दुचाकीवरून गावी परतत होते. वाटेत दबा धरून बसलेल्या प्रभूदयाल आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने भजनलाल यांना अडवले. त्यांनी लाकडी दांडक्याने भजनलाल यांच्या डोक्यावर जोरदार वार केले आणि दोरीने गळा आवळला. धक्कादायक म्हणजे, हा सर्व थरार सुरू असताना पत्नी इंद्रा मोबाईलवरून प्रियकराच्या सतत संपर्कात होती आणि हत्येचे अपडेट घेत होती.
मेला असे समजून कालव्यात फेकले, पण...
आरोपींनी भजनलाल यांना मृत समजून त्यांच्याच दुचाकीवर बसवले आणि २० किमी दूर कालव्यापाशी नेले. तिथे नेल्यावर भजनलाल यांना शुद्ध आली आणि त्यांनी हालचाल सुरू केली. हे पाहून घाबरलेल्या आरोपींनी जवळच पडलेल्या विटेने त्यांच्या डोक्यावर पुन्हा प्रहार केला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आणि दुचाकी कालव्यात फेकून दिली.
अशी उघडली गुपितं!
सुमारे १५ दिवसांनंतर २ फेब्रुवारी रोजी फलोदी भागात कालव्यात एक अज्ञात मृतदेह सापडला. तपासात तो भजनलाल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. जेव्हा मृतदेह घरी आणला, तेव्हा पत्नी इंद्राने "हा माझ्या पतीचा मृतदेह नाहीच" असे म्हणत कांगावा सुरू केला. तिच्या बदललेल्या वागण्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, इंद्रा आणि प्रभूदयाल यांच्यातील संभाषणाचे पुरावे हाती लागले.
पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखी बोलली
पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच इंद्रा मुलांसह माहेरी पळून गेली होती. मात्र, पोलिसांनी तिला तिथून ताब्यात घेतले. सुरुवातीला नकार देणाऱ्या इंद्राने पोलिसी खाक्या दाखवताच सर्व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पत्नी इंद्रा देवी, प्रियकर प्रभूदयाल याला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
Web Summary : A wife and her lover brutally murdered her husband in Rajasthan, India, because he was an obstacle to their affair. They dumped his body in a canal after repeated attacks. Police investigations revealed the crime, leading to arrests.
Web Summary : राजस्थान में एक पत्नी और उसके प्रेमी ने अपने पति की बेरहमी से हत्या कर दी, क्योंकि वह उनके प्रेम संबंध में बाधा बन रहा था। बार-बार हमले के बाद उन्होंने उसके शव को एक नहर में फेंक दिया। पुलिस जांच में अपराध का खुलासा हुआ, जिसके बाद गिरफ्तारियां हुईं।