नारळ पडला अन् चोर सापडला; खेरवाडी पोलिसांकडून अटक
By गौरी टेंबकर | Updated: February 20, 2024 15:47 IST2024-02-20T15:47:42+5:302024-02-20T15:47:47+5:30
तक्रारदार गिरीश आंबेरकर (५०) यांचा कार भाडे तत्वावर देण्याचा व्यवसाय आहे.

नारळ पडला अन् चोर सापडला; खेरवाडी पोलिसांकडून अटक
मुंबई: झाडावरून पडलेल्या नारळामुळे घरात चोरी करायला शिरलेल्या एका चोराला पकडण्यात खेरवाडी पोलिसांना यश मिळाले. हा प्रकार वांद्रे पूर्व परिसरात घडला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार गिरीश आंबेरकर (५०) यांचा कार भाडे तत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. ते १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त घरीच होते. त्यादरम्यान घराच्या मागे नारळ पडल्याचा आवाज आल्याने त्यांच्या पत्नी तो आणायला गेल्या. त्यामागे पोहोचल्यावर एक अनोळखी इसम त्यांच्या बंगल्यातील पाईप वरून चढून मागून आत शिरायचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानी त्वरित याबाबत नवऱ्याला जाऊन सांगितले आणि आंबेरकर यांनी मातोश्री बंगल्या जवळ बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या निर्मल नगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीला ताब्यात घेतले त्याचे नाव गजानन भोसले (३३) होते. भोसले हा वांद्रे पुर्वच्या भारतनगर परिसरातील रहिवासी असून त्याला नंतर खेरवाडी पोलिसांकडे देण्यात आले. भोसलेवर पोलिसांनी संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.