गेल्या काही दिवसांपासून हुंड्यासाठी छळ, हुंड्यासाठी मारहाण अशा अनेक घटना कानावर येतच आहेत. यातच आता उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून हुंड्यासाठी छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. नवीनच लग्न झालेल्या वधूला तिच्या सासरी, पतीकडून अशी वागणूक मिळाली की, जी ऐकून कुणालाही प्रचंड चीड येईल. लग्नाच्या अवघ्या आठवडाभरात या वधुने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली आहे.
गोरखपूरच्या एम्स परिसरातून हे प्रकरण समोर आले आहे. गोरखपूरच्या बहरामपूर येथील एका महिलेचे लग्न १ जून रोजी एम्स परिसरात राहणाऱ्या कैथवालिया येथील एका तरुणाशी झाले होते. या महिलेच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. अशा परिस्थितीत महिलेचे लग्न तिच्या भावाने ठरवले होते. भावाने त्याच्या बहिणीच्या लग्नात तब्बल ५ लाख रुपये रोख, दागिने आणि घरातील वस्तू दिल्या होत्या. परंतु महिलेच्या सासरच्या लोकांना आणि पतीला हे पुरेसे नाही असे वाटले. त्यांनी आणखी हुंड्यासाठी तिला त्रास द्यायला सुरुवात केली.
किळसवाणा प्रकार
लग्नाच्या अवघ्या ४ दिवसांतच या महिलेच्या पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर, त्याने गुटखा खाऊन तिच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार केला. सतत चार दिवसापासून पती दारू पिऊन तिला मारहाण करत होता. यामुळे वैतागलेल्या महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना आपली आपबिती सांगितली.
महिलेच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर चार दिवसांपासून तिचा पती तिचा छळ करत आहे. तो दारू पिऊन घरी येतो आणि तिला मारहाण करतो. महिलेने सांगितले की, एकदा तिच्या पतीने तिला प्रथम मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने तिचे तोंड धरले आणि तोंडात गुटखा थुंकला. यामुळे महिलेला उलट्या होऊ लागल्या आणि तिची तब्येतही बिघडली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करणार महिलेने पुढे सांगितले की, तिचा नवरा तिला मारहाण करतो आणि तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवतो. जेव्हा महिलेने तिच्या सासरच्या लोकांना याबद्दल तक्रार केली, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगण्याऐवजी महिलेला हुंड्यासाठी टोमणे मारले. अशा परिस्थितीत, १६ जुलै रोजी ती तिच्या भावासोबत तिच्या माहेरी गेली. यानंतर, महिलेने तिच्या सासरच्या आणि पतीविरुद्ध स्त्रीधनला परत करण्याची मागणी करत गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.