प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून ऑटोचालकाला जबर मारहाण
By योगेश पांडे | Updated: August 20, 2023 15:36 IST2023-08-20T15:36:25+5:302023-08-20T15:36:40+5:30
सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सैय्यद नगमान सैय्यद रशीद (३८, मानकापूर) असे जखमी ऑटोचालकाचे नाव आहे.

प्रवासी घेण्याच्या मुद्द्यावरून ऑटोचालकाला जबर मारहाण
नागपूर : प्रवाशांची सवारी घेण्याच्या मुद्द्यावरून दोन आरोपींनी एका ऑटोचालकाला जबर मारहाण केली. यात ऑटोचालक गंभीर जखमी झाला असून मानस चौक बसस्टॉपजवळ तणाव निर्माण झाला होता. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सैय्यद नगमान सैय्यद रशीद (३८, मानकापूर) असे जखमी ऑटोचालकाचे नाव आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास मानस चौक बसस्टॉपजवळ सैय्यदने सवारी घेण्यासाठी ऑटो लावला होता. त्यावेळ तेथे निसार व रज्जाक हे आरोपी आले व या जागेवरून ऑटोत सवारी भरायची नाही असे म्हटले. तुम्ही मला म्हणणारे कोण असा सवाल सैय्यदने विचारले असता दोघांनीही वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करत सैय्यदला मारहाण केली.एका आरोपीने लाकडी दांड्याने सैय्यदच्या डाव्या हातावर वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी फरार झाले.
सैय्यदला मेयो इस्पितळात नेण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. मानस चौक, सिताबर्डी, पंचशील चौक, झाशी राणी चौक या परिसरांमध्ये सवारीच्या मुद्द्यावरून अनेकदा ऑटोचालकांमध्ये वाद होताना दिसून येतात. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ऑटोचालकांकडून इतरांना अक्षरश: वेठीस धरण्याचेदेखील प्रकार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.