मुंबई :मुलुंडमध्ये राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांसह दोन भाऊ आणि एका ओळखीच्या व्यक्तीने ११ महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली. ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.मुलुंड परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांनीच अत्याचार केले. त्यापाठोपाठ तिच्या १८ वर्षे आणि १६ वर्षांच्या दोन भावांसह एका ओळखीच्या ५७ वर्षीय व्यक्तीने जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत लैंगिक अत्याचार केले. या सर्वांचे लैंगिक अत्याचार सुरू असतानाच परिसरातील आणखी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक करीत अल्पवयीन मुलाला बालसुधारगहात पाठवले. यावेळी भीतीने घरातील अत्याचाराला वाचा फोडली नाही.तपासादरम्यान, पीडित मुलीलाही बालगृहात ठेवण्यात आले होते. तिने बालगृहाच्या अधीक्षकांना वडील, दोन भाऊ आणि ओळखीच्या व्यक्तीकडून अत्याचार केल्याची माहिती देताच त्यांनाही धक्का बसला. अधीक्षकांनी याची गांभीर्याने दखल घेत चाइल्ड वेलफेअर कमिटी सीडब्ल्यूसी यांना पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यास सांगितले.
आरोपी वडिलावर चोरीचाही गुन्हा पीडित मुलींनी तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती ‘सीडब्ल्यूसी’ला दिली. ‘सीडब्ल्यूसी’ने याबाबत मुलुंड पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपींवर अटकेची कारवाई केली आहे. तिन्ही आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील आरोपी वडिलांना दारू पिण्याचे व्यसन असून त्यांच्या विरोधात चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.