निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:18 IST2021-07-01T16:16:59+5:302021-07-01T16:18:29+5:30
सावत्र बहिणीनं घडवून आणला प्रकार; तिघांना अटक

निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार
सुलतानपूर: उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात चालत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी चालक, वाहकासह तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं.
कूरेभार पोलीस ठाण्याचे प्रमुख अमरेंद्र सिंह सोमवारी मध्यरात्री कूरेभार चौकात वाहनांची तपासणी करत होते. त्यांनी सेमरी रोडहून आलेली एक लक्झरी बस रोखली. पोलिसांनी बस तपासली असताना शेवटच्या सीटखाली एक अल्पवयीन तरुणी अतिशय दयनीय स्थितीत सापडली. यानंतर पोलिसांनी चालक हरिमंगल यादव आणि वाहक कुलदीप यादवला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पीडित तरुणीसोबत तिचा १० वर्षांचा भाऊदेखील बसमध्येच होता.
सावत्र बहिणीनं औषध देण्याच्या बहाण्यानं रात्री ११ वाजता आपल्याला घरातून बोलावलं होतं, अशी माहिती पीडितेनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. 'बहिण कुदारन गलिबहा गावात राहणाऱ्या शिवपूजन सिंहकडे घेऊन गेली. शिवपूजननं तिथे माझ्यासोबत दृष्कृत्य केलं. त्यानंतर मला बसमध्ये नेण्यात आलं. तिथे शिवपूजन आणि हरिमंगल यांनी माझ्यासोबत दुष्कृत्य केलं,' असा जबाब पीडितेनं पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी हरिमंगलला अटक केली. हरिमंगलला मदत केल्याप्रकरणी कुलदीप आणि पीडितेच्या सावत्र बहिणीलादेखील बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र शिवपूजन सिंह अद्याप फरार आहे.