बीएआरसी वैज्ञानिकाच्या पत्नीसोबत 'टास्क फ्रॉड', ट्रॉम्बे पोलिसांकडून तपास सुरू
By गौरी टेंबकर | Updated: June 17, 2023 08:34 IST2023-06-17T08:33:51+5:302023-06-17T08:34:39+5:30
त्यांना अद्याप जवळपास ७ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

बीएआरसी वैज्ञानिकाच्या पत्नीसोबत 'टास्क फ्रॉड', ट्रॉम्बे पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई: ट्रॉम्बेमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) मध्ये कार्यरत एका वैज्ञानिकाच्या पत्नीला सायबर भामट्यांनी ऑनलाइन नोकरीची टास्क देत फसवणूक केली. यामध्ये त्यांना अद्याप जवळपास ७ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार या ४२ वर्षीय महिला असून त्या बीएआरसी अणुशक्ती नगर या ठिकाणी पती मुलगा आणि सासऱ्यांसह राहतात. त्यांना १३ जून रोजी अनोळखी व्हाट्सअप अकाउंट वरून फोन आला होता. ज्याने तो एका कंपनीचा एचआर बोलत असून त्यांच्या कंपनीकडून अतिरिक्त पगारा साठी वर्क फ्रॉम होमची ऑफर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी एक लिंक दिली आणि त्या मार्फत टेलिग्रामवर चर्चा करण्यास सांगितले. हा टेलिग्राम नंबर सिद्धी पांडावर एक्सेस होऊन त्या ठिकाणी तक्रारदाराला मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीची ऑफर देत त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर सदर महिलेने विश्वास ठेवला आणि त्यांना दिवसाभरात दोन हजार रुपये कमवता येतील असे आम्ही दाखवण्यात आले.
तसेच त्यांना फक्त दिवसाभरात तास पूर्ण करण्याची जबाबदारी असेल असेही सांगण्यात आले. त्यानुसार व्हिडीओ लाईक करण्याच्या टास्कमध्ये त्यांना दीडशे रुपये मिळाले. मात्र पुढे पुढे त्यांना टास्क विकत घेण्यास सांगण्यात आले आणि त्यावर अधिकाधिक नफा मिळेल असे सांगत त्यांच्याकडून ७.६२ लाख रुपये उकळण्यात आले. हा प्रकार १४ मे पासून सुरू होता. पुढे संशय आल्यावर तक्रारदाराने त्यांचे पैसे परत मागितले. त्यावर भामट्याने त्यांना सदर रकमेवर जीएसटी कर आणि आयकर भरल्यास त्या बदल्यात त्यांना १० लाख रुपये मिळतील असेही सांगितले. त्यानंतर याची तक्रार ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.