उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधरापूर पोलीस स्टेशन परिसरातील पहलवानपूर गावात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूवर संतप्त ग्रामस्थांनी मांत्रिकाच्या घरासमोरील मंदिरात मृतदेह ठेवून गोंधळ घातला. या घटनेनंतर मांत्रिकाने थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
तेहबरपूर पोलीस स्टेशन परिसरातील नैपुरा येथील रहिवासी रणजित यादव यांची पत्नी अनुराधा यादव (३५) हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. भाऊ सुधीर यादव यांनी सांगितलं की, अनुराधा एका महिन्यापासून कंधारापूर पोलीस स्टेशन परिसरातील पहलवानपूर गावात तिचे वडील बळीराम यादव यांच्या घरी राहत होती. २०१४ मध्ये तिचं लग्न झालं.
११ वर्षात तिला मूल झालं नाही तेव्हा कुटुंबाने काळ्या जादूचा आधार घेण्याचा विचार केला. त्यानंतर अनुराधाच्या माहेरच्या मांत्रिकाने २२ हजार रुपये घेऊन महिलेला मूल होण्याची गॅरंटी दिली. रविवारी रात्री भूत काढण्याच्या नावाखाली, त्याने महिलेला मारहाण केली नाही, तिचा गळा दाबला आणि तिला घाणेरडं पाणी पाजलं. महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.
मांत्रिकाने कुटुंबाला खोटं सांगितलं. महिला सध्या बेशुद्ध आहे, ती काही वेळात शुद्धीवर येईल, नंतर तिला घरी घेऊन जा असं सांगितलं आणि पसार झाला. यानंतर कुटुंबीयांना महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांनी गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.