ऑनलाईन गेम खेळताना गमावले ६३ हजार; २६ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:33 IST2025-12-08T12:32:22+5:302025-12-08T12:33:58+5:30
तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो - ABP News
तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय तरुणीने ऑनलाईन गेममध्ये ६३ हजार गमावल्यामुळे व्यथित होऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण शिवगिरी आणि आसपासचा परिसर हादरून गेला आहे.
तेनकासी जिल्ह्यातील शिवगिरी परिसरातील आंबेडकर थेरू येथील रहिवासी प्रकाशची पत्नी पोन आनंदी (२६) एका खासगी रुग्णालयात काम करत होती. प्रकाश कोइम्बतूरमध्ये एका कंपनीत व्हॅन ड्रायव्हर आहे. दोघांचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना पुगाझिनी नावाची एक सुंदर दोन वर्षांची मुलगी आहे.
३ डिसेंबर रोजी, पोन आनंदी तिच्या मुलीला भेटण्यासाठी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि नंतर शिवगिरीला परतली. ४ डिसेंबरच्या सकाळी, प्रकाशची आई, सेल्वी सुनेला भेटायला गेली. बराच वेळ दार ठोठावल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दार आतून बंद होतं. सेल्वीने वेगळ्या चावीने दरवाजा उघडला. आत जाताच तिला पोन आनंदी तिच्या खोलीत छताला लटकलेली दिसली.
हे दृश्य पाहून सेल्वी मोठ्याने रडू लागली. शेजाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली आणि खोलीची झडती घेतली असता त्यांना एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत पोन आनंदीने स्पष्ट लिहिलं होतं की, "माझ्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही. ऑनलाईन गेममध्ये मी पैसे गमावले. मी काय करावे हे मला कळत नव्हतं, म्हणून मी हे पाऊल उचललं."
कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या चौकशीत असं दिसून आलं की पोन आनंदी बऱ्याच काळापासून तिच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होती. हळूहळू, तिला गेमचं व्यसन लागलं आणि तिने सुमारे ६३,००० गमावले, फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा हे झालं आहे. पैसे गमावल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.