दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात; उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील घटना
By आशपाक पठाण | Updated: December 27, 2023 20:28 IST2023-12-27T20:27:04+5:302023-12-27T20:28:32+5:30
तलाठी उमेश प्रकाश तोडकरी (४२) यांना पंचासमक्ष पकडले रंगेहाथ

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात; उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील घटना
आशपाक पठाण, उदगीर (लातूर) : येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले व उपजिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनियुक्तीवर असलेले तलाठी उमेश प्रकाश तोडकरी (४२) यांना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ हजार रुपयांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हणमंतवाडी (देवर्जन) येथील तक्रारदाराच्या काकूच्या नावे शेतात असलेल्या पाझर तलावासाठी संपादित जमिनीच्या मावेजाची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला व पुढील अधिकचा मावेजा मिळण्याकरिता अपिलाच्या फाइलमध्ये त्रुटी न काढता पाठवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतो म्हणून तलाठी उमेश तोडकरी ( रा. गोल्डनवुड्स सोसायटी देगलूर रोड, उदगीर) याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या पथकाने ही कारवाई केली.