सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवलं अन् दुपारी मुलाच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:01 IST2022-04-20T11:55:42+5:302022-04-20T12:01:49+5:30
शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे.

सकाळी आवरून मुलाला शाळेत पाठवलं अन् दुपारी मुलाच्या मृत्यूनं कुटुंब हादरलं
गाझियाबाद – दिल्लीनजीक असलेल्या मोदीनगर परिसरात बुधवारी १२ वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. हा शाळकरी मुलगा घरातून स्कूल बसनं शाळेत जाण्यासाठी निघाला होता. मात्र एका रस्त्याशेजारी असलेल्या खांबाला धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचली त्यानंतर तपासाला सुरूवात करण्यात आली आहे.
शाळेत शिकणाऱ्या अनुराग नेहरासोबत ही दुर्देवी घटना घडली आहे. कुटुंबाने सांगितल्यानुसार, मुलाला सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार केले. बॅग आणि जेवणाचा डबा देऊन त्याला शाळेत पाठवलं होते. त्यानंतर काही वेळाने शाळेच्या प्रशासनाकडून घरी फोन आला आणि पालकांच्या पायाखालची जमीन हादरली. शाळेत पाठवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडल्याने मोठा धक्का बसला. माहितीनुसार, शाळेत जाण्यासाठी तो ज्या स्कूल बसमध्ये बसला होता तेव्हा त्याला उलटी आली. त्यासाठी त्याने खिडकीतून बाहेर डोकावलं तेव्हा रस्त्याशेजारील खांबाला आदळून त्याचा मृत्यू झाला. मात्र शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचा आरोप मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाहन चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
मृत मुलाच्या कुटुंबीयांना शाळेवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी म्हटलंय की, शाळेच्या प्रशासनाकडून आमची दिशाभूल करण्यात आली. मुलाची तब्येत ठिक होती मग त्याला झालं काय? शाळा प्रशासन खोटं बोलत असल्याचं कुटुंबीयांचे म्हणणं आहे. मात्र या घटनेमुळे अनुरागच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आहे. त्याचसोबत इतर चौकशी सुरू आहे.