संशयावरुन एकावर चाकूने प्राणघातक हल्ला; दोंडाईचा येथील घटना, एकाविरोधात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Updated: April 1, 2023 14:04 IST2023-04-01T14:03:48+5:302023-04-01T14:04:42+5:30
आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. जमा झालेल्या लोकांमुळे संशयित इसम पळून गेला.

संशयावरुन एकावर चाकूने प्राणघातक हल्ला; दोंडाईचा येथील घटना, एकाविरोधात गुन्हा
धुळे : पोलिसांना माहिती पुरवितो असा संशय घेऊन चहा दुकान चालविणाऱ्या इसमावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याने वार चुकविल्यामुळे तो वाचला. ही घटना दोंडाईचा शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी रात्री साडेअकरा वाजता खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
दोंडाईचा येथील आदर्श नगरात राहणारे धनराज नथ्थू महाजन (वय ५२) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोंडाईचा शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ धनराज महाजन यांचे चहाचे दुकान आहे. याठिकाणी एक जण आला आणि जोरजोरात आरडा ओरड करत शिवीगाळ केली आणि तू कायम पोलिसांना माझ्याविषयी माहिती देत राहतो, असा संशय त्याच्यावर घेतला. संतापात मी तुला आज जिवंत सोडणार नाही असे बोलत त्याने चाकूसारखे धारदार हत्यार काढून डोक्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याने केलेला वार महाजन यांनी चुकविल्यामुळे ते थोडक्यात वाचले. दोघांमध्ये झटापट झाली.
आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. जमा झालेल्या लोकांमुळे संशयित इसम पळून गेला. स्वत:ला सावरत धनराज महाजन यांनी थेट दोंडाईचा पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. याप्रकरणी भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे घटनेचा तपास करीत आहेत.