शिवसेना नगरसेवकाच्या बर्थडेनंतर समर्थकाचा गोळीबार; दोन गटांत झाली हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 00:39 IST2021-03-25T00:38:59+5:302021-03-25T00:39:38+5:30
गुन्हा दाखल, मंगळवारी रात्री १२ वाजता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयात शेकडो समर्थक जमले होते.

शिवसेना नगरसेवकाच्या बर्थडेनंतर समर्थकाचा गोळीबार; दोन गटांत झाली हाणामारी
कल्याण : पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस साजरा झाल्यावर दोन गटांत हाणामारी होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिले.
मंगळवारी रात्री १२ वाजता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयात शेकडो समर्थक जमले होते. गवळी यांचा वाढदिवस गाजावाजा करीत साजरा करण्यात आला. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर गवळी हे त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर, मारहाणीचा आणि गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि महेश भोईर हे दोघे जण आले.
निलेश गवळीचे काही महिन्यांपूर्वी अन्य एका तरुणासोबत भांडण झाले होते. निलेशची त्याच्याबरोबर चर्चा सुरू असताना महेशने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहतापाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान, महेशने परवानाधारक रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.