भाऊ शोविकनंतर रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता; एनसीबी पाठवणार समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 22:31 IST2020-09-04T22:27:14+5:302020-09-04T22:31:09+5:30
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली.

भाऊ शोविकनंतर रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता; एनसीबी पाठवणार समन्स
मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एनसीबीने नुकतीच रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. यानंतर लगेचच रिया चक्रवर्तीला एनसीबीने समन्स धाडण्याची तयारी सुरु केली असून तिच्याही अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना एनसीबीने अटक केली.
याआधी ड्रग्ज कनेक्शन संबंधी कपिल झव्हेरी, अब्बास लखानी , फेयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केल्याची नावे आहेत. झव्हेरी व अब्बास यांना मंगळवारी पश्चिम उपनगरातील अड्डयावर छापे टाकून अटक केली. त्यानंतर बुधवारी इतरांना अटक करण्यात आली. हे सर्वजण बॉलिवूड आणि पेज र्थी पार्ट्यामध्ये अंमली पदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.
चौकशीत शोविकने रियासोबत ड्रगसंबंधी केलेले चॅट खरे असल्याचे कबुल केले आहे. यामुळे शोविकच रियासाठी मोठी अडचण ठरला आहे. या चॅटमध्ये रिया कोणत्यातरी व्यक्तीसाठी शोविककडे ड्रग्ज मागत आहे. यामुळे शोविकच्या म्हणन्यानुसार रियालाही अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सुशांतच्या हत्येच्या आरोपाचा तपास आता वेगळ्याच दिशेने जात असून हत्या की आत्महत्या यावर सीबीआयला उत्तर शोधायचे आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनेच सुशांतची हत्या केल्याचे पुरावे सापडत नसल्याचे म्हटले होते. यामुळे सीबीआय आता आत्महत्या केली असण्याच्या शक्यतेने तपास करत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे कोणती कारणे आहेत याचा शोधघेतला जात आहे.