'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:45 PM2019-08-20T21:45:58+5:302019-08-20T21:47:43+5:30

इस्राईल दुतावास, महाराष्ट्र सायबरचे चर्चासत्र

'Students should be cyber security ambassadors to prevent danger' | 'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'

'सायबर धोक्याच्या प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षादूत’ व्हावे'

googlenewsNext

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ  थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होणार आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या विश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षादूत (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांनी केले.
सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या वापर कसा करावा, याची माहिती देण्यासाठी व सायबर गुन्ह्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील इस्राईल दूतावास, नेहरू विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू विज्ञान केंद्रात झालेल्या या कार्यशाळेत मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयातील सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
इस्त्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत याकोव फिन्कलस्टन, उपवाणिज्यदूत निमरोड कलमार आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया, 'रिस्पॉन्सिबल नेटीझन' स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली पाटणकर, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मनोज प्रभाकरन यांनी चर्चासत्रात भाग घेतला.
या कार्यक्रमात इस्राईलमधील सायबर सुरक्षा तज्ञ मेन्नी ब्राझिले यांनी स्काईपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सायबर विश्वातील घडामोडी व सायबर सुरक्षेसंदर्भात संवाद साधला. स्मार्ट फोन, इंटरनेट आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरताना असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देत त्यांनी ऑनलाईन जगात स्वत:चे संरक्षण कसे करावे हे विविध पद्धती सांगून स्पष्ट केले.
महाराष्ट्र सायबरचे अधीक्षक सचिन पांडकर यांनी विविध सायबर सुरक्षा विषयक उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, सायबर गुन्ह्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबर कडक पावले उचलत आहे. महिला व मुलांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध आता थेट संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. तसेच फिशिंगच्या घटना टाळण्यासाठीही अँटि फिशिंग संकेतस्थळावर तक्रार केल्यास तातडीने दखल घेतली जाते. सायबर सुरक्षा तज्ञ आणि अन्वेषक रितेश भाटिया आणि सायबर सुरक्षा आणि जनजागृती साठी सुरु केलेल्या 'रिस्पॉन्सिबल नेटीझन' या उपक्रमाच्या संस्थापक सोनाली पाटणकर यांनीही विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करता काय काळजी घ्यावी, याबद्दल माहिती दिली.
महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘इस्राईलचे मुंबईतील दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी नक्कीच तंत्रज्ञानाचा वापर अधिक जागरूकतेने आणि आत्मविश्वासाने इंटरनेटचा वापर करतील.’ पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत म्हणाले, ‘या कार्यक्रमाद्वारे आपण भविष्यात उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासाठी तरुण पिढीला सक्षम करत आहोत. तरुणांमध्ये तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर कसा करावा याबद्दल जनजागृती होईल ज्याद्वारे घडणाºया आॅनलाईन गुन्ह्यांना आळा घालता येईल.’

Web Title: 'Students should be cyber security ambassadors to prevent danger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.