गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या वसुली एजंटकडून १६ वर्षीय मुलीला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावच्या नागरी निवारा परिसरात मंगळवारी घडला. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
गोरेगावच्या नागरी निवारा परिषद येथे तक्रारदार या त्यांच्या पती तसेच दोन मुलींसह राहतात. त्यांचे पती घरी नसताना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांच्या घरी एक महिला व पुरुष आले. त्यांनी तक्रारदाराच्या पतीबाबत विचारणा करत स्वतःची ओळख कोटक महिंद्रा बँकेचे वसुली एजंट म्हणून केली. तक्रारदाराने त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले, पण त्यांनी त्यास नकार दिला. तेव्हा जोपर्यंत ओळखपत्र दाखविणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कोणतीही माहिती देणार नाही, त्यांनी असे बजावले.
माझ्या पतीचा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असल्यास तुम्ही त्यांना संपर्क करा अशीही त्यांनी विनंती केली. त्यावर तुमच्या पतीचा मोबाईल क्रमांक माझ्याकडे नाही असे सांगत पैसे घेतात आणि हप्ते भरत नाहीत असे बोलून त्यांनी तक्रारदाराच्या पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ करू नका असे सांगितल्यावर त्यांनी तक्रारदारालाही शिव्या देत मोठमोठ्याने बोलण्यास सुरवात केली. त्यांचा आवाज ऐकून तक्रारदाराची १६ वर्षीय मुलगी तेथे आली आणि तिने त्या एजंटना हळू बोलण्याची विनंती केली. मात्र त्यांनी मुलीलादेखील शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने मुलीने घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पुरुष एजंटने मुलीच्या गळ्यावर हात मारत दरवाजा ढकलला. अखेर मुलीने या सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. तसेच ओळखपत्र दाखवा सांगितले तेव्हा आम्ही अर्ध्या तासाने पुन्हा येऊ असे म्हणत ते निघून गेले. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी दिली.
प्रकरण काय होते? तक्रारदाराच्या पतीने बँकेतून एक लाखाचे कर्ज घेतले होते. ज्याचे हप्ते ते वेळेवर देत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये आर्थिक स्थिती ढासळल्याने त्यांना ते देता आले नाहीत. त्यानुसार बँकेचे वसुली एजंट त्यांच्या घरी सतत येत होते.
व्हिडीओ शूटिंग पोलिसांना देणारमाझ्या मुलीने घडल्या प्रकाराचे मोबाइलमध्ये शूटिंग केले आहे. त्यानुसार ते अधिक तपासासाठी पोलिसांना देणार आहोत, असे मारहाण झालेल्या मुलीच्या आईने सांगितले.