पिंपरी : अंधारात संशयितरित्या वावरत असलेल्यांना हटकले असता त्यांनी गस्तीवरील पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. सांगवी येथे बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस नाईक अमोल लावंड, असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी अमोल लावंड आणि कल्याण भोसले हे दोघेही रात्रगस्तीवर होते. दरम्यान, घोलप महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही जण अंधारात संशयितरित्या वावरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून आवाज देत त्यांना हटकले. त्यामुळे अज्ञात संशयितांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात पोलीस नाईक लावंड जखमी झाले. तसेच, पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
सांगवीत संशयितांना हटकल्याने दगडफेक; पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:55 IST