गाझियाबाद नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनीकार चोरीची विचित्र घटना उघडकीस आणली आहे. पैशाच्या लोभापोटी एका महिलेने आपल्याच पतीची कार चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरीनंतर कार विकून मिळालेल्या पैशात मौजमजा करण्यासाठी महिलेने आपल्याच साथीदारांशी संपर्क साधला आणि पतीचीच कार चोरीचा कट रचला. कार चोरीला गेल्यानंतर विमा कंपनीकडून कारचे पैसे मिळतील, असे या महिलेला वाटत होते.
महिलेने कार चोरीचा प्लॅन आखला. मात्र, तिला पतीच्या कार चोरीचा कट महागात पडला. या कार चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी चोरट्यांची कसून चौकशी केली असता ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, आता मास्टर माईंड कार मालकाची पत्नी फरार असून तिला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पवित्रा या महिलेने आपला मित्र गौरव याच्यासोबत मिळून पतीची कार चोरून ती विकण्याचा कट रचला. या प्लॅननुसार, कारच्या विमा कंपनीकडे क्लेम करुन कारची किंमत वसूल केली जाईल. त्यानंतर मिळालेली किंमत दोघांमध्ये वाटून घेतली जाईल. त्यानुसार कारची चोरी करण्यात आली.
या घटनेनंतर पवित्रा हिचे पती नितीन त्यागी यांनी 6 रोजी नंदग्राम पोलीस ठाण्यात आपली कार चोरीला गेल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मॅन्युअल सर्व्हिलांसच्या आधारे कारचा शोध सुरू केला. पोलिसांनी कार चोरणाऱ्या गौरव शर्मा आणि आकाश त्यागी या दोन तरुणांना अटक केली. पोलीस चौकशीत पकडलेल्या आरोपींनी कारच्या मालकाच्या पत्नीसोबत संगनमत करून कार चोरीचा कट रचल्याचे पोलिसांना सांगितले.
एका लग्न समारंभात पवित्राने तिच्या पतीच्या कारची दुसरी चावी गौरवला दिली. त्या चावीद्वारे गौरवने साथीदारासह कार चोरली. त्यानंतर कारची नंबर प्लेट बदलली. तसेच, कारची डुप्लिकेट चावी बनवली आणि ओरिजनल चावी पुन्हा पवित्राला परत केली, असे आरोपींनी सांगितले. दरम्यान, चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करून कारही जप्त केली.
याचबरोबर, या संपूर्ण प्लॅनमध्ये सहभागी असलेल्या कारच्या मालकाची पत्नी पवित्रा हिचाही पोलीस आता शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गौरव आणि आकाश हे सराईत गुन्हेगार आहेत. आकाशच्या नावावर चोरी, गुंडगिरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असे एकूण आठ गुन्हे तर गौरवच्या नावावर पाच गुन्हे दाखल आहेत.