लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अँटाॅप हिलमधून बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचा मंगळवारी सकाळी ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सावत्र वडिलांनीच मुलीची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अँटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमीरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. अखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिली.
अमायराचा शोध सुरू असताना, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ससून डॉकजवळील समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोपी धनू नावाच्या मच्छीमाराला अमायराचा मृतदेह आढळला. त्याने मृतदेह बाहेर काढून कुलाबा पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत ओळख पटविण्यासाठी या चिमुकलीच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबईसह विविध पोलिस ठाण्यांना पाठवून तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी अँटॉप हिल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच अमायराचा शोध थांबला. या घटनेने तिच्या आईला धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिस घेत आहे.
लवकर झोपत नाही, सतत मोबाइल मागते अमायरा लवकर झोपत नव्हती. शिवाय सतत मोबाइल मागत होती. त्याच रागातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
...म्हणून संशयसोमवारी रात्री सावत्र वडील इम्रानसोबत अमायराला बघितले होते. अमायरा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तोही बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद लागत असल्याने त्याच्यावरचा संशय आणखी बळावला होता.
याप्रकरणी पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले आहे. तांत्रिक माहितीबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. इम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे.