कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! बनावट देशी दारुच्या ४८ हजार बाटल्या जप्त
By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 18:54 IST2024-03-07T18:54:16+5:302024-03-07T18:54:31+5:30
या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे

कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! बनावट देशी दारुच्या ४८ हजार बाटल्या जप्त
कल्याण: बनावट देशी दारुच्या बाटल्यांचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथकाने सापळा रचून जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पथकाने ट्रकसह ४८ हजार ४०० बनावट देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
बनावट देशी दारुचा ट्रक कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथकाला मिळाली होती. आज सकाळीच पथकाने कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकात सापळा होता. एक ट्रक सुभाष चौकात येताच. पथकाने त्या ट्रक चालकाला हटकले. ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये ४८ हजार ४०० देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या. हा बनावट देशी दारुचा साठा पथकाने जप्त केला आहे. देशी दारुची वाहतूक करणारा हा ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला आहे.
बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या साईनाथ रामगिरवार आणि अमरदीप फुलझेले या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या देशी दारुंच्या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील देशी दारू बनवणारया एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोघांनी दारूचा साठा कुठून आणला आणि तो साठा ते कुठे घेऊन जाणार होते ? याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.