रायगड: राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात महिला सुरक्षीत नाहीत मात्र याचे सरकारला काहीच पडलेले नाही. रोहा येथील घटना लाजीरवानी आणि चिड आणणारी आहे. गुन्हेगारांविरोधात जलदगती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. प्रविण दरेकर यांनी आज मृत पावलेल्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै 2020 रोजी घडली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घटनचे पडसाड राज्यात उमटले. मंगळवारी 28 जुलै 2020 रोजी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. राज्य सरकारचा पोलिस प्रशासनावर वचक राहीलेला नाही. त्यामुळे सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली. पिडीत कुटूंबाच्या बाजूने न्याय मिळावा यासाठी खटला चालवताना नामांकीत वकील दिला जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, पिडीत मृत पावलेली मुलगीही कबड्डी आणि कराटे खेळ खेळायची. त्यामुळे तिच्याबाबतीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये एकापेक्षा अधिक आराेपी असण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. याप्रसंगी माजी मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, माधवी नाईक, अॅड. महेश मोहिते, अमित घाग आदी पदाधिकारी उपस्थित होते.