जमिनीच्या वादातून एका क्रूर पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात ही घटना घडली असून, आरोपी पतीने पत्नीला विजेचा धक्का देऊन संपवले, तर तिला वाचवण्यासाठी धावलेल्या सासऱ्यालाही जखमी केले आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
नेमकं काय घडलं?
उमरी बेगमगंज येथील बकसैला गावात राहणाऱ्या पवन कश्यपचा विवाह २०१७मध्ये संगीता हिच्याशी झाला होता. संगीता ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते.
पवन लग्नापासूनच आपल्या सासऱ्याकडे हुंड्यात जमीन मागत होता. या मागणीसाठी तो सतत पत्नीवर दबाव टाकत होता आणि सासरे मंगल यांच्याकडेही जमिनीसाठी वारंवार तगादा लावत होता. संगीता आपल्या वडिलांसोबत राहत होती, पण पवनला ही जमीन आपल्या नावावर करून हवी होती.
रविवारी रात्री पवन आपल्या सासरी आला. या दरम्यान जमिनीवरून त्याच्यात आणि संगीतात वाद झाला. हा वाद रात्रीपासून सुरू होता.
विजेचा धक्का देऊन पत्नीची हत्यासोमवारी सकाळी जमिनीच्या वादातून संतापलेल्या पवनने संगीताला विजेचा झटका दिला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडील मंगल धावून आले, तेव्हा पवनने त्यांनाही विजेचा झटका दिला. विजेच्या धक्क्याने संगीताचा जागीच मृत्यू झाला, तर वडील मंगल बेशुद्ध होऊन खाली पडले.
घटनेनंतर गावातील लोकांनी पवनला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बेशुद्धावस्थेत असलेल्या मंगल यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन कश्यपला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.