उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने समाज, कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता. कौटुंबिक वादामुळे त्रस्त झालेल्या मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बनवलेल्या ६ मिनिटे ४७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, मानव रडत म्हणाला, "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात."
"लोकांना वाचवण्याची गरज आहे, अन्यथा एक वेळ अशी येईल जेव्हा असा कोणीही माणूस उरणार नाही ज्याला तुम्ही दोष देऊ शकाल. हा खूप कठीण काळ आहे. मी तुम्हाला माझे सांगतो. भाऊ, सगळ्यांचं सारखंच आहे. माझंही तसंच आहे. मला माझ्या पत्नीबद्दल कळालं. दुसऱ्या कोणासोबत तरी... काही हरकत नाही. कृपया हे पाहा आणि ऐका. मला जायला हवं."
"बरं, मला आता जायचं आहे, पण मी अजूनही हेच म्हणतोय की बघा... पुरुषांबद्दल विचार करा, कृपया विचार करा. अरे कोणीतरी पुरुषांबद्दल बोला. ते बिचारे खूप एकटे आहेत. ठीक आहे... सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, सॉरी अक्कू... पण मित्रांनो कृपया समजून घ्या. मी गेल्यावर सगळं ठीक होईल. तर मला जाऊ द्या. मी अजूनही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या आयुष्यातील माणसाबद्दल विचार करा, त्यांच्याबद्दल विचार करा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हो, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की माझ्या पालकांना अजिबात हात लावू नका." हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे आत्महत्येचे प्रकरण पाहून लोक हैराण झाले आहेत.
आग्रा येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या मानव शर्माचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी झाले. लग्नानंतर काही काळ सगळं काही नॉर्मल होतं, पण नंतर हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली. मानवचे वडील नरेंद्र शर्मा हे हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मानवच्या लग्नानंतर काही महिन्यांनी भांडणं सुरू झाली होती. सून भांडायची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी द्यायची. तिला तिच्या एका मित्रासोबत राहायचं होतं.