Solapur Crime : लातूरमध्ये राजकीय कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बार्शी रोड ते औसा रोड बाह्यवळण रस्त्याने सोलापूरकडे निघालेल्या इर्टिगा कार चालकाने क्रूझर जीपला कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे याचा हत्याराने भोसकून खून करण्यात आला. तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर या महिलेवरही जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर लातूरच्या खाडगाव रोड येथे ही घटना घडली.
कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे याने या प्रकरणी लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले. मात्र खाडगाव रोडने औसाकडे येताना जीपला ओव्हरटेक करताना इर्टिगा गाडीचा कट लागला.
गळ्यात खुपसला चाकू
त्यामुळे जीपच्या चालकाने शिवी दिली. त्यावर अनमोल केवटे यानेही दमबाजी केली. यामुळे संतापलेल्या चालकाने पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आडवी उभी केली. त्यानंतर केवटे आणि सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले. त्यावेळी विष्णू नावाच्या व्यक्तीशी त्यांची बाचाबाची आणि दोघांमध्ये झटापट सुरु झाली. तितक्यात दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकूने आरपार भोसकले. त्या व्यक्तीने केवटेच्या समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले. त्यामुळे केवटे जागेवरच कोसळला. तोपर्यंत सोनाली आणि दुसरी व्यक्ती एकमेकांचे केस धरून मारामारी करत होते. त्याने चाकूने सोनालीच्याही पाठीत, पोटात वार केले.
हद्दपारीच्या कारवाईनंतरही बिंधास्त फिरायचा
केवटे यांच्या चालकाने घटनेची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सोनाली गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी त्या शुद्धीवर आल्या. अनमोल केवटे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह दुपारनंतर मंद्रूप येथे आणण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे तथाकथित पदाधिकारी असलेल्या अनमोल केवटे याच्यावर सोलापूर आयुक्तालयाने हद्दपारची कारवाई केली होती. तरीही तो सोलापूर शहर आणि मंद्रूप परिसरात खुलेआम वावरत असायचा.
सोनाली भोसलेला स्वतःच केलं प्रदेशाध्यक्ष
सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात केवटे विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हद्दपारीची कारवाई केलेली असतानाही तो सोलापूर आणि धाराशिमध्ये निडरपणे फिरायचा. राजकीय नेत्यापेक्षा अनमोल केवटे या नावाची मंद्रूप परिसरात मोठी दहशत होती. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लेटर पॅडवर त्याने शिक्षण संस्था, शिक्षक, शासकीय कर्मचारी, पोलिस यांच्या विरोधात शेकडो तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींचा तो पाठपुरावाही करत असे. अनमोलला समितीमधून काढून टाकल्याने त्याने सोनाली भोसलेला स्वतःच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष घोषित केले होते. ही बातमीदेखील त्याने स्थानिक दैनिकात छापून आणली. लेटर पॅड तयार करून गेल्या महिनाभरात अनेक तक्रारीही दिल्या.
लोकांमध्ये केवटेची दहशत
शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात केवटे यांच्या वर्तनामुळे अनेक धडकी भरली होती. मुद्दा पकडून तो तक्रार द्यायचा आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना दमदाटी करायचा. अधिकारीही त्याच्या तक्रारीची दखल घ्यायचे. त्यामुळे मंद्रूप परिसरात त्याला विरोध करण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती अगदी पोलिसांमध्ये देखील अशी चर्चा आहे. मंद्रूप पोलिस ठाण्यात २०१५ ते ४ २०१८ दरम्यान चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी मागणे, मारामारी, दरोडा, दारू पिऊन गोंधळ घालणे, अशा तक्रारींचा समावेश आहे.