... तर सैफवर चाकूहल्ला करणारा संशयीत नागपुरातच पकडला गेला असता

By नरेश डोंगरे | Updated: January 19, 2025 00:15 IST2025-01-19T00:13:05+5:302025-01-19T00:15:06+5:30

फोटो आणि टॉवर लोकेशन दोन तास उशिरा : सैफच्या हल्लेखोराचा गोंदियापासून पाठलाग

...so the suspect who stabbed Saif Ali Khan would have been caught in Nagpur itself | ... तर सैफवर चाकूहल्ला करणारा संशयीत नागपुरातच पकडला गेला असता

... तर सैफवर चाकूहल्ला करणारा संशयीत नागपुरातच पकडला गेला असता

- नरेश डोंगरे

नागपूर : दोन तासाअगोदर माहिती मिळाली असती तर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा संशयीत शनिवारी नागपुरातच पकडला गेला असता. दोन तास उशिरा त्याचे फोटो आणि माहिती आरपीएफला मिळाली. त्यामुळे संशयीत आकाश कैलाश कन्नोजिया (वय ३१) याच्या रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग करून दुर्ग छत्तीसगडमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या.

आरपीएफच्या शिर्षस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा संशयीत आकाश कनोजिया याचा फोटो तपास यंत्रणांनी सर्वत्र वितरीत केला आहे. तो रेल्वे पोलीस तसेच आरपीएफलाही मिळाला आहे. त्याचे टॉवर लोकेशन शनिवारी दुपारी १२.२४ वाजता ट्रेन नंबर १२१०१ ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये आढळले. त्यावेळी ही ट्रेन नागपूरहून पुढे निघून गोंदिया-राजनांदगावच्या मध्ये होती. त्यामुळे आरपीएफची संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली. धावत्या ट्रेनमधून संशयीत कनोजियाचा शोध घेणे सुरू झाले. प्रत्येक डब्यात फोटोच्या आधारे कसून तपासणी सुरू असतानाच बोगी क्रमांक १९९३१७ सी मध्ये संशयीत कनोजिया आढळला. आरपीएफ दुर्गचे निरीक्षक एस. के. सिन्हा, आरक्षक श्रीराम मिना आणि निर्मला यांनी त्याला जेरबंद केले.

-------

व्हीडीओ कॉलवरून शहानिशा

पकडण्यात आलेल्या कनोजियाची माहिती आणि फोटो मुंबई पोलिसांना पाठविण्यात आले. त्यानंतर व्हीडीओ कॉल करून त्याची ओळख पटविण्यात आली. मुंबई पोलिसांनी 'हाच तो' संशयीत असल्याचे सांगताच त्याला ताब्यात घेऊन दुर्ग छत्तीसगडमध्ये आणण्यात आले.

-------

रविवारी सकाळी नेले जाणार मुंबईत

आरपीएफच्या शिर्षस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे पथक विशेष विमानाने रायपूर छत्तीसगडला शनिवारी रात्री पोहचणार असून संशयीत कनोजियाला ते ताब्यात घेऊन रविवारी सकाळी परत जाणार, असल्याची माहिती आहे. त्याला रेल्वेने न्यायचे असल्यास नागपूर मार्गे नेले जाणार आहे. सध्या तो दुर्ग आरपीएफच्या ताब्यात आहे.

--------------

Web Title: ...so the suspect who stabbed Saif Ali Khan would have been caught in Nagpur itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.