कंपनीचा संचालक बनून कोट्यवधी लाटणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:25 IST2025-07-11T08:25:27+5:302025-07-11T08:25:27+5:30
तपासामध्ये शुभमच्या नावे असलेल्या बँक खात्यावर व आरोपींच्या अंगझडतीत मिळून आलेल्या चेकबुकमधील बँक खात्यावर एकूण ११ सायबर तक्रारींची नोंद एनसीआरपीवर आहे.

कंपनीचा संचालक बनून कोट्यवधी लाटणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक
मुंबई : कंपनीचा संचालक असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील ६ जणांना पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, गोवा, उत्तर प्रदेशमधील आरोपींचा समावेश आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका नामांकित कंपनीत कर्मचारी असून १२ ते १५ एप्रिलदरम्यान ते कार्यालयात असताना एका अनोळखी व्हॉटसअॅपद्वारे संदेश आला. कंपनीचे संचालक बोलत असल्याचा बनाव करून त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना १ कोटी ९३ लाख ६ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. अखेर, त्यांनी पश्चिम सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात पथकाने या गुन्ह्यातील बेनिफिशरी बँक खातेधारक, खातेधारकांना मुंबईत आणून हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्याकडून बँकेची किट स्वीकारणारे, खातेधारक पुरविणारे, इंटरनेट बँकिंग प्रवेशाचे अधिकार चिनी आरोपीना देणाऱ्या आरोपींचा मागोवा घेऊन त्यांची धरपकड करण्यात आली. याप्रकरणी शुभम बाजीराव कुंजीर (२८,पुणे), अक्षय गोरख शेळके (२८,नाशिक ), उज्ज्वलराज अवधेशकुमार सिंह (२९,अंधेरी), शुभमकुमार जयपालसिंह परदेशी ऊर्फ राजपूत (२८, नाशिक), आदित्य दिलीप शिंदे ऊर्फ लुसिफर (३१, गोवा), आर्यन शिवपाल मिश्रा ऊर्फ सिंचन नोहरा ऊर्फ आरू (३३,उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.
यामध्ये अक्षय, उज्ज्वल आणि शुभमकुमार यांच्यावर खातेधारकांना मुंबईत बोलावून हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून त्यांच्याकडून बँक खात्याची किट प्राप्त करून सायबर गुन्ह्यासाठी पुरविण्याची जबाबदारी होती. आदित्यवर बेनिफिशरी खातेधारकांची माहिती पुढे पाठविण्याची तर आर्यनवर फसवणुकीची रक्कम परदेशी चलनात व क्रिप्टो फाईलद्वारे चिनी आरोपींना पाठवणे, फसवणुकीची रक्कम करन्सीमध्ये बदलण्याची जबाबदारी होती. तसेच तो परदेशातील आरोपींच्या संपर्कात होता. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
२८ मोबाईल, १३ चेकबुक अन् पिस्टल जप्त
आरोपींकडून २८ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, १६ विविध टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड, बँक खात्यांचे १३ चेक बुक,८ डेबिट कार्ड यांच्यासह आर्यनकडून १ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.
बँक खात्यावर ११ तक्रारी
तपासामध्ये शुभमच्या नावे असलेल्या बँक खात्यावर व आरोपींच्या अंगझडतीत मिळून आलेल्या चेकबुकमधील बँक खात्यावर एकूण ११ सायबर तक्रारींची नोंद एनसीआरपीवर आहे. त्याद्वारे लोकांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचेही निष्पन्न झाले आहे. याबाबत पुढील तपास सुरु असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.