मित्राशी फोनवर बोलत आणि फिरत असल्याने भावाकडून बहिणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 21:12 IST2018-08-28T21:11:22+5:302018-08-28T21:12:07+5:30
आरोपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन असल्याने आम्ही त्याला अटक करून भिवंडीच्या सुधारगृहात रवानगी केली असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.

मित्राशी फोनवर बोलत आणि फिरत असल्याने भावाकडून बहिणीची हत्या
वसई - रक्षाबंधन होऊन दोन दिवस उलटले आणि बहिण मित्राशी सतत फोनवर बोलत असल्याने आणि फिरत असलयाने चिडलेल्या भावाने तिची हत्या केली आहे. वसईच्या वालीव येथे ही घटना घडली. मंगळवारी वालीव पोलिसांनी १६ वर्षीय भावाला अटक केली असून त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
पिडीत तरुणी १९ वर्षाची असून ती वसई पूर्वेकडील वालीव येथे आई आणि दोन भावांसोबत राहत होती. ती महाविद्यालयात शिकत होती तर तिची आई घरकाम करते. तिचा एक भाऊ मुंबईत काम करतो तर १६ वर्षीय भाऊ घरीच असतो. पिडीत तरूणी तिच्या मित्राशी सतत फोन वर बोलत असे आणि मित्रांसोबत फिरत असे याचा तिच्या भावाला राग होता. रात्री उशीरा ती मित्राशी फोनवर बोलत असल्याने त्याची झोपमोड देखील व्हायची. मित्राशी फोनवर बोलू नको म्हणून तिच्या भावाने तिला ताकीदही दिली होती. सोमवारी तिची आई आणि दुसरा भाऊ कामावर गेले होते. आरोपी भावाने या मुद्द्यावरून तिच्याशी भांडण करून त्या भांडणात तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली. आरोपी हा घरीच असतो आणि त्याने शाळा सोडली आहे. यापूर्वी देखील त्याने आपल्या बहिणीला याच कारणावरून मारहाणही केली होती. आरोपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन असल्याने आम्ही त्याला अटक करून भिवंडीच्या सुधारगृहात रवानगी केली असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले. ती मित्राशी तासनतास बोलत असते याचा भावाला राग होता. त्यामुळे त्याने ही हत्या केल्याचे जाधव यांनी सांगितले.