हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातून एका धक्कादायक घटनेची बातमी समोर आली आहे. इथे एका निर्दयी मुलाने घरगुती वादातून आपल्या आईची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरला आणि नंतर आई हरवल्याचा बनाव करून त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आता पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
सिंरमोर जिल्ह्याच्या पच्छाद उप-विभागातील सराहन ग्रामपंचायतीच्या चडेच गावात ही घटना घडली. ५१ वर्षीय जयमंती देवी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयमंती देवी यांचा मुलगा पुष्प कुमार यानेच ही क्रूर हत्या केली.
सुरुवातीला पुष्प कुमारने आपल्या आईच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र, तपास सुरू असताना, त्याच्या बहिणीने आणि काही स्थानिकांनी पोलिसांकडे पुष्पवर संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, तो नेहमी आपल्या आईसोबत भांडण करत असे. पोलिसांनी पुष्पची चौकशी सुरू केली.
हत्येची दिली कबुली
सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, पण पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुष्पने सांगितले की, शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा एका घरगुती कारणावरून त्याचे आणि आईचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने एका जड वस्तूने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात जयमंती देवी यांच्या डोक्याला, हाताला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने गळा दाबून तिचा जीव घेतला.
पोलिसांनी सांगितले की, पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत त्याने आईचा मृतदेह घरापासून सुमारे १०० मीटर दूर असलेल्या शेतात नेऊन पुरला.
पुढील तपास सुरू
पुष्पच्या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजगडचे पोलीस उप-अधीक्षक व्ही. सी. नेगी यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आरोपी पुष्पच्या वडिलांचे, लच्छी कुमार, यांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. यापूर्वीही पुष्पवर कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.