ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 06:34 AM2023-02-21T06:34:22+5:302023-02-21T09:51:42+5:30

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली.

Singer Sonu Nigam attacked by Thackeray's MLA Prakash Fatarpekar 'selfie-seeker' son | ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झटापट झाली. सोनू परफॉर्म करत असताना स्थानिक आमदारानं सोनूची टीम मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 

आमदाराच्या मुलाला सोनू निगमसोबत फोटो काढायचा होता, म्हणून तो स्टेजवर चढला. परंतु सोनू टीमने त्याला मज्जाव केला असता स्वप्निल आणि त्याचे कार्यकर्ते भडकले. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने गायकाला स्टेजच्या मागच्या पायऱ्यांकडे ढकलले. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी दिली. 

घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली. सोनू निगम याला वाचवताना त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान हे दोन जण जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनू निगमची कॉलर पकडण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनू निगमसोबत स्टेजवर झटापट सुरू होती. तेव्हा त्याच्या अंगरक्षकाने सोडवण्याचा प्रयत्न केला. सोनू निगमला ढकलले असता अंगरक्षक मध्ये आला तेव्हा त्यालाही धक्का दिल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडला. दरम्यान, या व्यक्तीने पुन्हा सोनूला कॉलरने पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा सहकारी गायक रब्बानी खान याने सोनूला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर त्या हल्लेखोराने रब्बानी खान यांनाही जोरात ढकलले आणि तोदेखील पायऱ्यांवरून ७ फूट खाली जमिनीवर पडला. सुदैवाने, या झटापटीत सोनू निगमला दुखापत झाली नाही, परंतु त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान जखमी झाले.


 

Web Title: Singer Sonu Nigam attacked by Thackeray's MLA Prakash Fatarpekar 'selfie-seeker' son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.