वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
By प्रविण मरगळे | Updated: October 9, 2025 10:03 IST2025-10-09T10:02:36+5:302025-10-09T10:03:16+5:30
घरच्या वरच्या मजल्यावर शुभमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. शुभमच्या पत्नीने तातडीने शेजाऱ्यांना ही माहिती दिली.

वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
नवी दिल्ली - गुरूग्राम येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. याठिकाणी २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरनं टोकाचं पाऊल उचललं आहे. ५ महिन्यापूर्वी या युवकाचं लग्न झालं होते, मात्र अलीकडे तो मानसिक तणावाखाली होता. राजस्थानच्या अलवर येथे राहणाऱ्या या युवकाने आत्महत्येचा निर्णय का घेतला हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. दिल्लीतील युवतीसोबत लव्ह मॅरेज करून तो गुरुग्राम येथे राहायला आला होता. मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव शुभम मीणा असं आहे. शुभम राजस्थानच्या अलवर येथे राहणारा होता. गुरुग्रामच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत तो काम करत होता. त्याला वर्षाला २० लाख रूपये पॅकेज होते. अलीकडेच शुभमने दिल्लीत राहणाऱ्या एका युवतीसोबत प्रेम विवाह केला होता. लग्नानंतर हे दोघेही गुरुग्रामच्या नयागाव परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. मंगळवारी शुभमने राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तो त्याच्या खोलीतून बराच उशीर बाहेर पडला नव्हता. जेव्हा त्याची पत्नी त्याला पाहायला खोलीत गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
घरच्या वरच्या मजल्यावर शुभमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. शुभमच्या पत्नीने तातडीने शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही त्यामुळे शुभमने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. सध्या पोलिसांनी शुभमच्या नातेवाईकांची चौकशी केली तेव्हा तो बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावाखाली होता हे समोर आले. या प्रकरणी पोलीस अजून शोध घेत आहेत.
दरम्यान, प्राथमिक तपासात शुभम मानसिक तणावाखाली होता, त्याच्यावर उपचार सुरू होते. तो नियमितपणे गोळ्याही घेत होता हे कळलं. त्याशिवाय शुभमने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली. परंतु पोलिसांनी अद्याप पुष्टी केली नाही. शुभमचा मोबाईल फोन तपासला जात आहे. त्यातून काही धागेदोरे सापडतायेत का याचा पोलीस शोध घेत आहे.