धक्कादायक! विशाखापट्टणमवरून आलेला गांजा जप्त, दोन तस्करांना अटक, टोयोटा कार जप्त
By दयानंद पाईकराव | Updated: February 19, 2024 20:07 IST2024-02-19T20:05:37+5:302024-02-19T20:07:22+5:30
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

धक्कादायक! विशाखापट्टणमवरून आलेला गांजा जप्त, दोन तस्करांना अटक, टोयोटा कार जप्त
दयानंद पाईकराव, नागपूर: विशाखापट्टनम येथून टोयोटा कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून १७ लाख ७१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारचालक, यशपाल नानकचंद चव्हाण (३२) आणि अंकीत श्यामविर सिंग (२१) दोघे रा. विजयनगर, अकबरपूर, बहेरामपूर, जि. गाझियाबाद, उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी १८ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला विशाखापट्टनम आंध्रप्रदेश येथून पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा-नागपूर रोडवर नारायणा स्कूलसमोर सापळा रचून टोयोटा कार क्रमांक एच. आर. २६, ए. एक्स-०१२७ ला थांबविले. कारचालक आणि त्याच्या बाजुला बसलेल्या व्यक्तीला बाहेर काढून कारची झडती घेतली असता त्यात ७ लाख ६१ हजार ५५० रुपये किमतीचा ५० किलो गांजा आढळला. गांजा आणि टोयोटा कार असा एकुण १७ लाख ७१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त करून आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) (२), (क), २९ एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.