संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: सायबर चौकत दारूच्या नशेत सराईत गुंड अजय पाथरुट याने तलवारीचा धाक दाखवून रविवारी रात्री दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने एका तरुणावर हल्ला करत परिसरातील वाहनांची तोडफोड केली. त्या गुंडास जमावाने बेदम चोप दिला. दरम्यान या घटनेमध्ये श्रीनंद महादेव वडर हा तरुण जखमी झाला. दोघांवरही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा हल्ला वर्चस्ववादातून झाल्याचा अंदाज आहे.
सराईत गुंड अजय पाथरुत याने रविवारी रात्री दारूच्या नशेत गल्लीमध्ये तलवार घेऊन दहशत माजवत वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. परिसरातील जमावाने यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र हातामध्ये तलवार असल्याने अजयने जमावावरच हल्ला केला. यामध्ये श्रीनंद वडार हा जखमी झाला. त्याच्या डाव्या कानावर खोलवर जखम झाली आहे. परिसरातील अन्य नागरिकांनी अजयला पकडून चोप दिला. दोघांनाही जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गंभीर वार झाल्याने अजयच्या डोक्यावर जखम झाली आहे. घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली होती.