मुंबईजवळच्या नालासोपारा येथील हॉवर्ड इंग्लिश स्कूलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतील निदा निझाउद्दीन नावाच्या एका शिक्षिकेने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर चक्क 'कॉलीन' (काच स्वच्छ करण्याचे रसायन) फवारल्याचा आरोप आहे. वर्गात दुर्गंधी येत असल्याची तक्रार करायला गेलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षिकेने हा स्प्रे फवारल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर पालकांनी तक्रार केली असता, शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेचा गंभीर गैरकारभार उघड झाला असून, शाळेला तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?२३ जुलै रोजी ही क्रूर घटना घडली. वर्गात दुर्गंधी येत असल्याची तक्रार करायला आल्यानंतर, शिक्षिकेने एका ८ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर थेट घरगुती वापराचे रसायन फवारले. ही गोष्ट मुलाने घरी सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ शाळेत जाऊन या प्रकाराबद्दल शिक्षिकेला जाब विचारलं असतं, तिने माफी मागितली. मात्र, पालकांनी अधिकृत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला.
'unexplored_vasai' या इन्स्टाग्राम हँडलने या घटनेची माहिती सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यामुळे हा प्रकार इंटरनेटवर व्हायरल झाला आणि देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
शिक्षण विभागाकडून चौकशी आणि गंभीर गैरकारभार उघड!या घटनेनंतर हॉवर्ड इंग्लिश स्कूल राज्य शिक्षण विभागाच्या रडारवर आले. चौकशीदरम्यान या शाळेबद्दल आणखी धक्कादायक माहिती समोर आली. ही शाळा विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद येथील दुसऱ्या शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट देत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला, तो गेल्या तीन वर्षांपासून याच शाळेत शिकत होता. यामुळे हॉवर्ड इंग्लिश स्कूलच्या नोंदणी आणि वैधतेबद्दलही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
शाळेला टाळे लावण्याचे आदेशया अहवालानंतर पालघर जिल्हा परिषदेने या घटनेची तालुका स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत गंभीर अनियमितता आढळल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेला तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी म्हणाले, "शाळेला बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे. नोटीस बजावूनही जर शाळा कार्यरत राहिली, तर शाळेविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल."
पीडित विद्यार्थ्याच्या आईने मिररशी बोलताना सांगितले, "या प्रकरणात विभागाने तातडीने कारवाई केल्याने मला आनंद आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि अशी घटना इतर कोणत्याही विद्यार्थ्यासोबत होऊ नये. चौकशी पूर्ण झाल्यावर, त्यातील निष्कर्षांनुसार आम्ही पुढील पाऊल उचलू." या प्रकरणी पालक आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्यात ३१ जुलै रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे.