उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस स्टेशन हद्दीत अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. सोनकपूर ओव्हरब्रिजजवळील जंगलात पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातून पतीने प्रथम पत्नीचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतःच्या पोटात चाकू खुपसून जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत पतीचे नाव विनोद उर्फ विकी आणि पत्नीचे नाव ममता असून, ते सिव्हिल लाईन्स भागातील नवीन नगर येथील रहिवासी होते. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास विनोदने होळी साजरी करण्यासाठी सासरच्या घरी जातोय असे सांगून ममताला सोबत घेतले. मात्र, सासरी नेण्याऐवजी तो तिला सोनकपूर ओव्हरब्रिजजवळील निर्जन जंगलात घेऊन गेला. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात विनोदने ममतावर जीवघेणा हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद आणि ममता यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली होती, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. या कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. कुटुंबाने असा आरोप केला आहे की, विनोदला दुसरे लग्न करायचे होते आणि त्यासाठी तो बिहारलाही जाऊन आला होता. ममताने आपल्या आईला सांगितले होते की, विनोद तिला सतत मारहाण करत असे आणि मुले होत नसल्याने दुसऱ्या लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकत असे. ममता या लग्नाला विरोध करत असल्याने विनोदने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह आणि माझोला पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृताची दुचाकी जप्त केली आहे. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, विनोदने प्रथम पत्नीच्या मानेवर वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्या केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.