अझहर शेख, मनोज मालपाणी, नाशिक: जन्मदाता मद्यपी पित्याने आपल्या आठ वर्षाच्या लेकराचा राहत्या घरात गळा दाबून खून केला अन् त्याचा मृतदेह गोणीत टाकून सासूच्या घराच्या दारात नेऊन टाकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२९) दुपारी घडली. नाशिक शहरातील जेलरोडवरील मंगलमूर्तीनगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी सुमित भारत पुजारी (३८) याला अटक केली.
जेलरोडच्या मंगलमूर्ती नगरमधील सोहम सोसायटीमध्ये संशयित पुजारी हा त्याच्या कुटुंबियांसमवेत राहतो. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, मुलगी आहेत. मागील काही दिवसांपासून पुजारी दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते. मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा. त्यामुळे पत्नीने आठवडाभरापुर्वी मुंबई येथील नातेवाईकांचे घर गाठले होते. तसेच मोठा मुलगा, मुलगी हेदेखील आजोबाकडे गेलेले होते.
मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्यपी सुमित व लहान मुलगा गणेश पुजारी हे दोघेच घरात होते. यावेळी गणेशचा पित्याने गळा आवळला अन् त्याचा मृतदेह गोणीत टाकून काही अंतरावर असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सासुच्या दारात नेऊन टाकल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मुलाचा खुन करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.