Wife killed Husband Latest News: काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारं सत्य समोर आलं. मयत व्यक्तीच्या भावाने पोलिसांना तपास करण्याची मागणी केली. तपास केल्यानंतर जे समोर आलं, त्यामुळे पोलिसही हादरले. व्यावसायिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला नाही, तर हत्या करण्यात आली, असे तपासातून समोर आले. ही हत्या पत्नीनेच केली. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी आणि इतर दोन तरुणांच्या मदतीने महिलेने पतीची हत्या केली. यातील एका तरुणाचे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काही दिवसांपूर्वी आसाममधील दिब्रूगडमध्ये व्यावसायिक उत्तम गोगोई उर्फ सांकई यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. २५ जुलै रोजी लाहोन गावातील घरात त्यांचा मृतदेह मिळाला होता. उत्तम गोगोई यांची पत्नी बॉबी गोगोई आणि त्यांच्या मुलीने या प्रकरणाला दरोड्या पडल्याचे वळण देण्याचा प्रयत्न केला.
उत्तम गोगोई यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह त्यांच्या घरातून महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. दरोडा पडल्यानंतर त्यांचा अवस्थ वाटून ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे पत्नी आणि मुलीने उत्तम गोगोई यांच्या भावाला आणि पोलिसांना सांगितले.
मृतदेहावरील खूण आणि भावाला आला संशय
उत्तम गोगोई यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ घरी आला. त्याने मृतदेह बघितला. त्यावेळी उत्तम गोगोई यांचा कान कापलेला होता. ते पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उत्तम गोगोई यांच्या भावाने पोलिसांकडे ही शंका बोलून दाखवली आणि तपास करण्याची मागणी केली.
पत्नी बॉबीनेच मुलगी आणि दोन तरुणांच्या मदतीने केली हत्या
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आठ दिवसांतच पोलिसांना या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यात यश आले. पोलिसांनी उत्तम गोगोई यांची पत्नी, मुलगी आणि दोन तरुणांना अटक केली. घरातून चोरी झालेले सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या.
दिब्रूगडचे पोलीस अधीक्षक राकेश रेड्डी यांनी सांगितले की, "आम्ही उत्तर गोगोई यांच्या हत्या प्रकरणामध्ये ४ जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर दोन तरुणांचा समावेश आहे. गोगोईच्या मुलीने हत्या केल्याची कबूली दिली आहे. आम्ही सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत."
उत्तम गोगोई यांची पत्नी बॉबी आणि मुलीने हत्या का केली? याचे कारण पोलिसांना अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, पोलिसांनी ज्या दोन तरुणांना अटक केली आहे, त्यापैकी एका तरुणासोबत गोगोई यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.