उत्तर प्रदेशातील महराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागेश्वर रौनियार यांच्या खुनाचा पोलिसांनी २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतक नागेश्वरची पत्नी नेहा रौनियार आणि तिचा प्रियकर जितेंद्र यांना अटक केली आहे. दोघांनी मिळून नागेश्वरला दारू पाजून, गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकून देऊन अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला.
नेमके काय घडले?रविवारी पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी या खुनाचा खुलासा केला. १२/१३ सप्टेंबरच्या रात्री सुमारे ३ वाजता निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दमकी गॅस एजन्सीजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताची ओळख नागेश्वर रौनियार अशी झाली. नागेश्वरचे वडील केशव राज रौनियार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी नेहा आणि गावातील जितेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल केला.
२४ तासांत लावला गुन्ह्याचा छडा!नागेश्वरच्या खुनाचा पोलिसांनी २४ तासांच्या आत छडा लावून आरोपी नेहा रौनियार आणि जितेंद्र यांना अटक केली. निचलौल पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अखिलेश वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्या जबाबाच्या आधारे आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?आरोपी जितेंद्रने पोलिसांना सांगितले की, नागेश्वर त्याच्या दुकानात काम करत होता. त्यानेच जितेंद्रला एका मुलीचा नंबर दिला होता. त्या मुलीशी बोलता-बोलता त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर जितेंद्रला कळले की ती मुलगी दुसरी कोणी नसून नागेश्वरची पत्नी नेहा आहे. दोघांना लग्न करायचे होते, पण नागेश्वर त्यांच्या मार्गात अडसर ठरत होता. त्यामुळेच दोघांनी मिळून नागेश्वरची हत्या करण्याचा कट रचला.
आरोपींनी कबूल केले की, १२ सप्टेंबरच्या रात्री नागेश्वरला सिव्हिल लाइनमधील त्यांच्या भाड्याच्या खोलीत बोलावले. तिथे त्याला दारू पाजून झोपवले. नागेश्वर झोपल्यावर नेहा आणि जितेंद्रने त्याचे पाय बांधून गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह मोटरसायकलवर ठेवून दमकी गॅस एजन्सीजवळ फेकून दिला. हा अपघात असल्याचा बनाव करण्यासाठी त्यांनी मोटरसायकलही तिथेच पाडून ठेवली होती.