ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याचा बहाणा; सात वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:31 IST2021-07-06T23:30:46+5:302021-07-06T23:31:36+5:30
वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याचा बहाणा; सात वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून लैंगिक अत्याचार
नवी मुंबई - सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आईला बाहेर नेल्यानंतर घरी येऊन हे कृत्य केले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर 9 येथे राहणाऱ्या सात वर्षीय मुलीसोबत हे कृत्य घडले आहे. सदर मुलगी दुसरीत शिकत असून घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन नव्हता. यामुळे तिच्या आईने शेजारीच राहणाऱ्या कुटुंबाकडे मदत मागितली होती. त्यानुसार 9 जुलैला शेजारचे दांपत्य त्या महिलेला घेऊन मोबाईलच्या दुकानात गेले होते. त्याठिकाणी लोनवर मोबाईल मिळवून देतो असे त्याने महिलेला सांगितले. यादरम्यान महिलेची मुलगी घरी एकटीच असताना चेक घेण्याच्या बहाण्याने तो परत घरी आला. यादरम्यान त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. मात्र काही वेळाने पुन्हा सर्वजण घरी आले असता मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली. परंतु भयभीत झालेल्या कुटुंबाने तक्रार देण्याचे टाळले होते. मात्र त्या घटनेनंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने मंगळवारी त्यांनी वाशी पोलीसांकडे तक्रार केली. त्याआधारे वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.